बेळगावच्या दर्शन प्रॉडक्शन निर्मित थ्री लेग्ड हॉर्स अर्थात तीन पायाचा घोडा या चित्रपटाची न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल -2022 साठी निवड झाली आहे.
न्यूयॉर्क भारतीय चित्रपट महोत्सव
(न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल) भारतीय उपखंडातील दर्जेदार चित्रपट माहितीपट आणि लघुपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करणारा चित्रपट महोत्सव आहे.
यंदाच्या 22 व्या न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे (एनवायआयएफएफ) गेल्या 7 मेपासून आयोजन करण्यात आले असून तो उद्या 14 मे पर्यंत चालणार आहे. या महोत्सवात बेळगावच्या दर्शन प्रॉडक्शन निर्मित थ्री लेग्ड हॉर्स अर्थात तीन पायाचा घोडा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.
पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या वास्तविक जीवनातील तीन घटनावर आधारित हा चित्रपट आहे. बनावट गुणपत्रिका घोटाळ्यांमध्ये सापडलेले श्रीमंत मुलांचे त्रिकूट, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या युवतीवर दिवसाढवळ्या झालेला बलात्कार आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या बस चालकाने वेडाच्या भरात तब्बल 20 लोकांवर भरधाव वेगाने घातलेली बस, या वास्तविक घटनांच्या पार्श्वभूमीवर तीन श्रीमंत मुलांच्या जीवनात घडलेले नाट्य थ्री लेग्ड हॉर्स अर्थात तीन पायाचा घोडा या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
संबंधित संबंधित घटनांमुळे अदनान, चंद्रिका आणि राठोड हे जीवाभावाच्या मित्रांचे त्रिकूट भावी जीवनातील आपली वाटचाल सुकर नाही तर तीन पायांची शर्यत आहे हे शिकतात, असा या चित्रपटाचा थोडक्यात आशय आहे. नुपूर बोरा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.