बेळगाव शहरातील बेवारस मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीसाठी महापालिकेकडून ठेकेदार नियुक्त झाला असून नियम व अटी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या महिनाअखेरीस ही नसबंदी मोहीम सुरू केली जाईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे.
शहरातील सुमारे 6 हजार मोकाट कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. मड्डूर येथील व्हाॅइसलेस ॲनिमल वेल्फेअर संस्थेला या कामाचा ठेका मिळाला आहे. विधान परिषद निवडणूक जाहीर होण्याआधीच ठेकेदार नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यासाठी निवडणूक संपण्याची प्रतिक्षा केली जाणार नाही.
तथापि मोहिमेसाठी कांही नियम निश्चित करणे आवश्यक आहे ते काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. एकदा नियम निश्चित झाले की मग ठेकेदाराला कार्यादेश दिला जाईल. त्यानंतर लागलीच मोहीम सुरू होईल, असे डॉ डुमगोळ यांनी सांगितले.
पावसाळ्यात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढतो. याकाळात कुत्र्यांकडून नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनाही घडतात. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी नसबंदी मोहीम सुरू करण्याचे नियोजन आहे. या मोहिमेसाठी केंद्रीय प्राणी कल्याण मंडळाने दर देखील निश्चित केल्याने आता हे काम सुरू करण्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही.
यावेळी महापालिकेला एका मोकाट कुत्र्याच्या नसबंदीसाठी किमान 1650 रुपये खर्च करावे लागणार आहेत, अशी माहितीही आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.