देशात महाराष्ट्रानंतर बेळगावमध्ये शिवजयंती उत्सव अतिशय भव्य प्रमाणात साजरा केला जातो. येथील अद्वितीय पारंपरिक शिवजयंती उत्सव आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक यंदा 103 व्या वर्षात पदार्पण करत असून येत्या बुधवार दि. 4 मे 2022 रोजी ही ऐतिहासिक जल्लोषी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक निघणार आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात 1919 साली बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती साजरी करण्यास प्रारंभ झाला. सुरवातीच्या काळात शिवजयंती मिरवणुकीमध्ये सजविलेल्या बैलगाड्यांच्या स्वरूपातील चित्ररथांचा सहभाग असायचा आणि ती मिरवणूक ठराविक गल्ल्यांमध्ये काढली जायची.
मात्र कांही वर्षांनंतर शहरातील कांही मंडळांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. परिणामी या उत्सवाची व्यापकता आसपासच्या उपनगरांपर्यंत वाढली. त्याकाळी चित्ररथ सजावटीसाठी नारळ, नारळाच्या झाडाच्या फांद्या, केळीची झाडे आणि पाने यांचा वापर केला जात असे.
पुढे बदलत्या काळानुसार शिवजयंतीचे चित्र पालटत गेले. आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटीसह लक्षवेधी देखावे सादर केले जाऊ लागले. या देखाव्यांमधून शिवकालीन इतिहास, छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम सादर करण्याबरोबरच स्थानिक समस्यांना वाचा फोडली जाऊ लागली. हिंदवी स्वराज्य संस्थापक आपला महापराक्रमी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने शिवप्रेमी अबालवृद्ध या मिरवणुकीप्रसंगी गर्दी करू लागले. शिवजयंती मिरवणुकीचा दिवस उजाडला की मिरवणूक मार्गावरील मोक्याच्या जागा पकडण्यासाठी लोकांची धडपड सुरू व्हायची.
जल्लोषात निघणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीतील लाठी आणि करेला फिरविणे, तलवारबाजी, दांडपट्टा फिरवणे, लेझीम पथक झांज पथक आदींची प्रात्यक्षिके पाहणे हा प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. नरगुंदकर भावे चौक येथून सायंकाळी निघणाऱ्या बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती मिरवणुकीची सांगता चक्क दुसऱ्या दिवशी पहाटे श्री कपिलेश्वर मंदिर येथे होते, इतके या मिरवणुकीचे स्वरूप भव्य असते हे विशेष होय.