नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आता बेळगावचे जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस प्रणालीद्वारे कार्य करणार आहे. यासंदर्भातील आदेश नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.
पेपरलेस कार्यप्रणालीसाठी अनिवार्यपणे बदल करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या असून यासाठी डीएस कार्ड, लॅन सुविधेसंदर्भात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे.
यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे आणि दस्तऐवज सक्तीने पेपरलेस व्हावेत, या दृष्टिकोनातून व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व विभागांचे शिरस्तेदार, व्यवस्थापकांनी पेपरलेस कार्यप्रणाली हाताळणे आवश्यक आहे.
सर्व विभागातील प्रमुखांनी आपल्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सूचना द्याव्यात, आवश्यकता असल्यास तांत्रिक सल्लागार नेमून कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानासंदर्भात प्रशिक्षण द्यावे, अशीही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.
पेपरलेस कार्यप्रणाली न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे.