कॅन्टोन्मेंट बोर्डाला तोट्यात टाकणारी शहरातील जुन्या भाजी मार्केटमधील धूळ खात पडून असलेली दुकाने एक तर भाड्याने द्या अन्यथा जेसीबी लावून जमीनदोस्त करा, असा परखड सल्ला बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाला दिला आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाची मासिक बैठक आज मंगळवारी कॅम्प येथील बोर्डाच्या मुख्य कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बोर्डाचे नूतन अध्यक्ष ब्रिगेडियर जाॅयदीप मुखर्जी हे होते.
बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बजेट, आर्थिक विवरण, वार्षिक प्रशासकीय अहवाल, विकास कामे, टॅक्स, जन्म-मृत्यू दाखला, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन -निवृत्ती वेतन तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालकीचे जुने भाजी मार्केट दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्यामुळे जुन्या भाजी मार्केटमधील दुकान गाळे रिकामी धूळखात पडून आहेत. त्यापासून कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत नसल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला तोटा सहन करावा लागत आहे.
या रिकामी पडून असलेल्या दुकान गाळ्यांचा गैरवापर होत असून या ठिकाणी अनैतिक व बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्यामुळे संबंधित रिकामी दुकाने टेंडर काढून भाड्याने देण्यात यावीत अथवा जेसीबी लावून जमीनदोस्त करण्यात यावीत, असा परखड सल्ला अध्यक्ष ब्रिगेडियर मुखर्जी यांना दिला. बैठकीस कॅन्टोन्मेंट बोर्डाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.