टिळकवाडी येथील आरपीडी क्रॉस येथे गेल्या कित्येक महिन्यांपासून गटारीचे पाणी तुंबून दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची डबक्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार तक्रार करून देखील कोणीच त्याची दखल घेत नसल्यामुळे शहरातील बीएसएन रेजिमेंटने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी गांधीगिरी करत या डबक्याचे रंगीबिरंगी फुगे लावून निषेधात्मक सुशोभीकरण केले.
आरपीडी कॉर्नर येथील कोपऱ्यावर असलेल्या कृष्णा कम्युनिकेशन या दुकानाचा शेजारील गटार गेल्या कित्येक महिन्यांपासून तुंबून पडली आहे. त्यामुळे या ठिकाणी सांडपाण्याचे मोठे डबके निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गटारासह कांही प्रमाणात रस्त्यावर निर्माण झालेल्या या डबक्यात एका लहान मुलासह सुमारे 8 जण पडले आहेत.
संबंधित गटाराचे सांडपाणी कायम तुंबलेले असल्यामुळे या भागात अस्वच्छतेसह दुर्गंधीचे वातावरण पसरण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. यामुळे हैराण झालेल्या स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी संबंधित गटार सफाईची वारंवार मागणी करूनही आजतागायत महापालिका आणि स्मार्ट सिटी यापैकी कोणीही त्याची दखल घेतलेली नाही.
यासंदर्भात बीएसएन रेजिमेंटचे वरूण कारखानीस आणि अनिरुद्ध पाटणेकर यांनी टिळकवाडी येथील स्मार्ट सिटी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता. त्यांनी गोवावेस येथील महापालिका कार्यालयात तक्रार नोंदवण्याचा सल्ला दिला. त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील दोघा जणांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयात जाऊन आरोग्य निरीक्षकांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कारखानीस आणि पाटणेकर यांनी मनपा मुख्य कार्यालयात जाऊन तेथील संबंधित अभियंत्याची भेट घेतली. त्यांनी आरपीडी कॉर्नर येथील आरोग्य निरीक्षकाशी संपर्क साधून माहिती घेतली आणि संबंधित गटार वेळोवेळी स्वच्छ केली जाते, मात्र ती पुन्हा तुंबत आहे.
तेंव्हा यावर कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर तुम्ही स्मार्ट सिटी लि.कडे जा असे सुचविले. दरम्यान कारखानीस व पाटणेकर यांनी स्थानिक नगरसेवकांना देखील गटार तुंबण्याच्या समस्येची माहिती दिली. अखेर सर्वांकडूनच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यामुळे आज बुधवारी सकाळी आरपीडी कॉर्नर येथील तुंबलेल्या गटारीच्या सांडपाण्याच्या डबक्याच्या ठिकाणी रंगबिरंगी फुगे लावून गांधीगिरी करत बीएसएन रेजिमेंटच्या सदस्यांनी निषेध नोंदवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.