भारतीय लष्कराच्या माध्यमातून जवळपास 20 वर्षे देशसेवा करून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कंग्राळी खुर्द येथील विनायक पुंडलिक पाऊसकर यांची गावात भव्य मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.
कंग्राळी खुर्द गावचे सुपुत्र असणारे विनायक पाऊसकर हे गेल्या 11 सप्टेंबर 2002 रोजी भारतीय लष्करात दाखल झाले. लष्कराच्या सिग्नल विभागात रुजू झालेल्या विनायक यांनी प्रारंभी राजोरी जम्मु येथे तीन वर्षे सेवा बजावली. त्यानंतर भटिंडा, राष्ट्रीय रायफल्स बरेली, पुढे तेजपुर आसाम त्यानंतर नवी दिल्ली आणि अखेर श्रीनगर (जम्मू काश्मीर) येथे देशसेवा केली आहे.
या पद्धतीने 19 वर्ष आणि 7 महिन्यांच्या सेवेअंती हवालदार पदावर असताना विनायक पाऊसकर हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर हवाईमार्गे आज मंगळवारी बेळगावात परतलेल्या पाऊसकर यांचा विमानतळावर माजी सैनिक संघटना बेळगावचे परशराम मुरकुटे, शब्बीर भाई पटवेगार आदींनी पुष्पहार घालून उत्स्फूर्त स्वागत केले.
विमानतळावरील स्वागत समारंभानंतर सेवानिवृत्त हवालदार विनायक पुंडलिक पाऊसकर यांची कंग्राळी खुर्द गावांमध्ये रथामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी पाऊसकर यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी आर. आय. पाटील, यल्लाप्पा पावशे, मनोहर पाटील, परसराम आपटेकर, परसराम हुलमनी, सोमनाथ लाड आदी उपस्थित होते.
सवाद्य निघालेल्या हवालदार विनायक पाऊसकर यांच्या मिरवणुकीत युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या समाप्तीनंतर कंग्राळी खुर्द गावाततर्फे देशसेवा करून परतल्याबद्दल हवालदार विनायक पाऊसकर यांचा मानाचा फेटा बांधून यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पाऊसकर कुटुंबीय, त्यांची मित्रमंडळी, हितचिंतक आणि गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.