कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या 9 विद्यार्थिनी फुटबॉलपटू बेंगलोर येथे आयोजित कर्नाटक राज्य दुसऱ्या मिनी ऑलंपीक गेम्स -2022 फुटबॉल स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
बेंगलोर येथे येत्या 17 ते 20 मे या कालावधीमध्ये कर्नाटक राज्य दुसऱ्या मिनी ऑलंपीक गेम्स -2022 या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवातील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेतर्फे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शहरातील कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधील 9 विद्यार्थिनी अर्थात फुटबॉलपटूंची बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे.
स्तुती सवदी, श्रुती वर्मा, तनिषा लगाडे, साल्विया गोम्स, किंजल तलवार, रिया वाळके, गौतमी जाधव, झोया मुल्ला आणि दिशा डोंगरे अशी या फुटबॉलपटूंची नावे आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंना बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्याबद्दल सेंट जोसेफ शाळेच्या प्राचार्या सिस्टर मेरी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून त्याला शाबासकी दिली. तसेच शुभेच्छा व्यक्त दिल्या. याप्रसंगी फुटबॉल प्रशिक्षक मॅन्युअल डीक्रूज तसेच शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या.
बंगलोर येथे आयोजित कर्नाटक राज्य दुसऱ्या मिनी ऑलंपीक गेम्स -2022 मधील फुटबॉल स्पर्धेमध्ये बेंगलोर, दावणगिरी, म्हैसूर, हावेरी, विजयपुरा, कलबुर्गी, कारवार आदी 14 जिल्ह्यांच्या संघांचा सहभाग असणार आहे.
मुला-मुलींच्या अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असून अंतिम सामना येत्या 20 मे रोजी खेळविला जाणार आहे. मुलींच्या गटातील बेळगाव शहर संघाचा पहिला सामना 17 मे रोजी सकाळी 9 वाजता कारवार संघाविरुद्ध होणार आहे.