बेळगाव विमानतळावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून एप्रिल या केवळ एकाच महिन्यात 14 टक्के प्रवासी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येच्या बाबतीत बेंगलोर आणि मंगळूर पाठोपाठ बेळगाव विमानतळ राज्यात तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
बेळगाव विमानतळावरून गेल्या एप्रिल महिन्यात 30,689 प्रवाशांनी ये-जा केली आहे. विमानतळ प्राधिकरणाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बेळगाव विमानतळाने मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून आत्तापर्यंत राज्यातील आपले तिसरे स्थान कायम ठेवले आहे. बेळगाव विमानतळावरून नवी दिल्ली, नागपूर, बंगळूर, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, अहमदाबाद, इंदोर, सुरत, तिरुपती व जोधपूर मार्गावर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरत, तिरुपती आणि पुणे मार्गे किशनगड, गुलबर्गा व नाशिकला बेळगाव लिंक सेवा उपलब्ध आहे.
बेळगाव विमानतळावरून सध्या स्पाइस जेट, स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलायन्स आदी विमान कंपन्यांकडून प्रवासी सेवा दिली जात आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात बेळगाव विमानतळावरून 23,084 प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला होता. त्यानंतर मार्च महिन्यात 30,467 प्रवाशांनी विमान प्रवास केला, तर एप्रिल महिन्यात 34 हजार 689 प्रवाशांनी विमान सेवेचा वापर केला. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्याचा विचार केल्यास एप्रिलमध्ये प्रवासी संख्येत 14 टक्के इतकी वाढ झाली आहे. या महिन्याभरात विमान प्रवाशांची संख्या 4,222 ने वाढली आहे. बेळगाव विमानतळावरून दिल्ली आणि नागपूर ही नवीन सेवा सुरू केल्यानंतर दररोज सरासरी 1200 प्रवासी या दोन्ही सेवांसह इतर मार्गांवरील सेवेचा लाभ घेत आहेत.