मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करुन उडपी येथे आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदार संतोष पाटील प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात असतानाच आता पाटील यांनी केलेल्या त्या 108 विकास कामांची जिल्हा पंचायतीकडून देखील सत्यासत्यता पडताळून पाहिली जाणार असून त्यासाठीच्या आदेशाची जिल्हा पंचायतीला प्रतीक्षा आहे.
कंत्राटदार संतोष पाटील यांनी आत्महत्या करताना मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर केलेला 40 टक्के कमिशनचा आरोप आणि केलेल्या 4 कोटींची 108 कामे चर्चेचा विषय ठरले आहेत. उडपी पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत. कोणतीही अधिकृत मंजुरी किंवा आदेश नसताना कामे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यातच जिल्हा पंचायत अध्यक्षना दिलेल्या निवेदनाच्या झेरॉक्स प्रतीवर त्याची पोच घेत त्यावर हिरव्या अक्षराने कामांना मंजुरी दिल्याची बनवेगिरी उघड झाली आहे. याबाबत ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याने बेंगलोरला स्वतंत्र पोलीस फिर्याद दाखल केली आहे. बनवेगिरी कुणी का केली? ही कामे कशी झाली? याची चौकशी जिल्हा पंचायतीकडून होईल.
जिल्हा पंचायतीने हिंडलगा ग्रामपंचायतीच्या पीडीओ वसंतकुमारी के. यांच्याकडे चौकशी केली आहे. विकास कामाच्या शुभारंभप्रसंगी आमदारांना का निमंत्रण नाही? अशी विचारणा केली असून यात ग्रामपंचायत आणि ग्रामविकास खात्याचे अनुदान असल्याचे पीडिओंनी जिल्हा पंचायतीला सांगितले आहे.
त्यामुळे 108 कामे विना मंजुरी झालीच कशी? हा मुद्दा चर्चेला आला आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांनी देखील हिंडलगा ग्रामपंचायती भोवती चौकशीचा ससेमिरा सुरूच ठेवला आहे. काल शुक्रवारी सकाळपासून दुपारपर्यंत त्यांनी पीडिओ वसंतकुमारी के. यांची चौकशी केली.