सुळगा -येळ्ळूर शिवारामध्ये काल सोमवारी सायंकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच खून करून सदर तरुणाचा मृतदेह शिवारात आणून टाकल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.
सुळगा -येळ्ळूर शिवारामध्ये काल सोमवारी सायंकाळी सुमारे 25 ते 30 वर्षे वयाच्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगावर कपडे नाहीत.
केवळ अंडरवेअरवर असणारा तरूणाचा मृतदेह कांही ठिकाणी काळवंडला आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्री बेळगाव ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक आनंद आदगोंड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
अंधारामुळे मृतदेहाची ओळख पटवता आली नाही. पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला असून प्राथमिक माहितीनुसार या मृतदेहावर जखमा नसल्या तरी शरीराचा काही भाग काळवंडला आहे.
संबंधित तरुणाचा मृत्यु नेमका कसा झाला? त्याचा कोणी घातपात केला आहे का? शिवारात केवळ अंडरवेअरवर तो कसा पोहोचला? याची चौकशी करण्यात येत आहे. सदर घटनेची बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.