बेळगाव शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असणाऱ्या एल अँड टी कंपनीकडून सध्या जोशी गल्ली, शाहूनगर येथे पाणी गळती शोधण्यासाठी जागोजागी खोदाई करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एल अँड टी कंपनीने बेळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी उचलली असली तरी या कंपनीचे एकंदरीत कार्यपद्धती पाहता नागरिकांना पूर्वीचे शहर पाणीपुरवठा मंडळच बरे होते अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
एल अँड टी कंपनी ही देशातील एक नामवंत कंपनी असली तरी बेळगाव शहरातील या कंपनीची कार्यपद्धती निराशाजनक असल्याचा आरोप केला जात आहे. सध्या या कंपनीकडून जोशी गल्ली शाहूनगर येथील रस्त्याच्या दुतर्फा पाणी गळती शोधण्यासाठी खुदाई केली जात आहे.
जोशी गल्ली येथील रस्ता आधीच अरुंद आहे. यात भर म्हणून दुतर्फा खोदाई करून मातीचे ढिगारे रस्त्यावर टाकले जात आहेत. परिणामी स्थानिक नागरिकांना विशेष करून वाहन चालकांना सदर रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
खुदाई करून शहानिशा केल्यानंतर खड्डे त्वरित बुजवले जात नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.