बेळगाव शहरातील महादेव गल्ली येथे गेल्या गुरुवारी भिंत कोसळून कामगार ठार झाल्याच्या घटनेची महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली असून ज्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे त्या इमारतींच्या तीनही मालकासह संबंधित अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
महादेव गल्ली येथे भिंत कोसळून कामगार ठार झाल्याच्या घटनेचा ठपका महापालिकेने इमारत मालकांसह अभियंत्यांवर ठेवला आहे. ज्या इमारतीचे बांधकाम सध्या तेथे सुरू आहे. त्या इमारतीच्या तीनही मालकांना महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
इमारतीला मंजूर केलेला बांधकाम परवाना का रद्द करू नये? अशी विचारणा करण्यात आली आहे. त्याचे उत्तर देण्यास 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. तसेच संबंधित इमारतीच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या अभियंत्याला देखील नोटीस बजावली आहे. महापालिकेकडून दिलेल्या परवाना रद्द करून त्यांचे नांव ब्लॅकलिस्टमध्ये का समाविष्ट केले जाऊ नये? अशी विचारणा करण्यात आली आहे.
या नोटिशीला उत्तर देण्यासाठी अभियंत्याला 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. नोटिशीत नमूद केलेल्या वेळेत बांधकाम मालक किंवा अभियंत्याने उत्तर दिले नाही तर महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांनी नोटिसीद्वारे स्पष्ट केले आहे. महापालिकेने काल शुक्रवारी महेंद्र जैन, सुंदराबाई जैन आणि विजय पोरवाल -जैन हे तिघे इमारत मालक त्याचप्रमाणे महापालिका परवानाधारक अभियंता मिलिंद बेळगावकर यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेतल्याने निष्काळजीपणा तून महादेव गल्ली येथे बांधकाम कामगाराचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात घरमालक, अभियंता तसेच मेस्त्री विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महादेव गल्ली येथे गेल्या गुरुवारी भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू होण्याबरोबरच अन्य दोघे जण जखमी झाले होते.
त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी दोघा घरमालकांसह अभियंता आणि मेस्त्री यांच्यावर कामगाराचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर अधिक अधिक तपास करत आहेत.