बेळगाव शहर परिसरा सह ग्रामीण भागात सध्या यात्रोत्सव आणि विवाह समारंभाची धूम सुरू आहे. मात्र यानिमित्ताने डॉल्बीच्या केला जाणारा दणदणाट चिंतेचा विषय बनू लागला आहे. यासाठी डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात यात्रोत्सव सभा -समारंभ आदी सर्वांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र प्रादुर्भाव निवडल्यानंतर सर्व निर्बंध मागे घेण्यात आले असल्यामुळे सर्वत्र सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांच्या आयोजनात उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. सध्या यात्रा, विविध उत्सव आणि लग्न समारंभ धूमधडाक्यात सुरू आहेत. यासाठी बहुतेक सर्व ठिकाणी डॉल्बीचा वापर केला जात आहे. मात्र हा वापर केला जात असताना डॉल्बी संदर्भातील नियमांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अत्यंत मोठ्या आवाजात सुरू असलेल्या डॉल्बीचा दणदणाटामुळे ध्वनी प्रदूषण होण्याबरोबरच नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष करून लहान मुले, वृद्ध आणि हृदयविकार, रक्तदाब असलेल्या लोकांसाठी डॉल्बीचा कानठळ्या बसणारा दणदणाट धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ध्वनिप्रदूषणाचा मनुष्यप्राणी नव्हे तर पशुपक्ष्यांवरही विपरीत परिणाम होतो, जाणकारांचे मत आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, डॉल्बीच्या दोन बेस दोन टॉपचा आवाज 100 डेसिबल्सच्यावर जाता कामा नये. जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. यासाठी डॉल्बीचा आवाज 100 डेसिबल्सच्या आत राहील याची दक्षता घेतली जावी. जर का या नियमाचे उल्लंघन झाल्यास पोलीस किंवा प्रशासन गुन्हा नोंद करू शकते.
डॉल्बीचा दणदणाटामुळे होणारे एकंदर ध्वनिप्रदूषण पाहता आजच्या घडीला डॉल्बीवाल्यांनी आवाजाची मर्यादा पाळणं अत्यंत गरजेचे आहे. लहान मुले, रुग्ण आणि वयोवृद्ध मंडळी यांच्या हिताच्या दृष्टीने लग्न समारंभ असू दे, यात्रा असू दे असू दे त्याठिकाणी आयोजकांनी डॉल्बीच्या ध्वनी अर्थात आवाजाची मर्यादा पाळवी. यासाठी पोलिस प्रशासनाने करडी नजर ठेवणे त्याचप्रमाणे युवक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जागरूक राहणे अत्यावश्यक आहे.
डॉल्बीचा दणदणाट हा चिंताजनक विषय आहे अनेकांना हा जीवघेणा ठरू शकतो असं पर्यावरणवादी अभ्यासकांचं मत आहे त्यासाठी प्रशासनासह जनतेने देखील डॉल्बीचा वापर कितपत व्हावा सजग रहात त्यासाठी जनजागृती करून पुढाकार घेण्याची गरज आहे.