बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकनजीक भटकत असलेल्या एका अनोळखी मुलीला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केल्याची घटना आज सकाळी घडली.
बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकनजीक आज आज गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास एक मुलगी भांबावलेल्या अवस्थेत भटकत असल्याचे अभय बेळगुंदकर, गुरुराज बनाजी, सुधीर शहापूरकर आणि प्रशांत भागोजी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यासंबंधीची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांना दिली.
सदर माहिती मिळताच अनगोळकर यांनी तात्काळ मध्यवर्ती बस स्थानक येथे दाखल होऊन त्या मुलीची विचारपूस केली. त्यावेळी संबंधित मुलीचे नाव 16 वर्षीय वैशाली कदम असल्याचे स्पष्ट झाले.
तसेच ती महाराष्ट्रातून एकटीच बेळगावला आल्याचे समजताच सुरेंद्र अनगोळकर यांनी तिला महिला पोलीस ठाण्यात नेले.
या ठिकाणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एन. हिरेमठ आणि महिला पोलिसांनी वैशालीची अधिक चौकशी केली. त्यानंतर बेळगावातील तिचे काका महादेव कारेकर यांना बोलावून घेऊन वैशालीला यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.