Friday, October 18, 2024

/

झाडं कोसळले वीस हुन अधिक दुचाकींचे नुकसान

 belgaum

बेळगाव शहर आणि परिसराला आज सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपून काढल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शहराच्या सखल भागात पाणी साचण्याबरोबरच कांही ठिकाणी वादळी पावसामुळे झाडे कोसळून विद्युतपुरवठा खंडित झाला, तर सिव्हिल हॉस्पिटल रोडवर झाड उन्मळून पडल्याने सुमारे 15 दुचाकींचे नुकसान झाले.

बेळगाव शहर परिसरात गेल्या 10 -15 दिवसांपासून अधून-मधून वळीवाचे जोरदार आगमन होत आहे. कांही भागात जोरदार तर कांही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काल विश्रांती घेणाऱ्या पावसाचे आज सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह आगमन होताच साऱ्यांची तारांबळ उडाली. विशेष करून बाजारपेठेतील रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनचालकांना जोरदार सरींमुळे वाहने रस्त्याकडेला थांबुन आसरा शोधावा लागला.Rain tree fall

वादळी पावसामुळे डॉ. बी. आर. आंबेडकर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटल समोरील एक जुनाट वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडला. हा वृक्ष नेमका रस्त्याशेजारी पार्क केलेल्या दुचाकींवर कोसळल्यामुळे सुमारे 15 -20 दुचाकींचे नुकसान झाले. याखेरीज बहुतांशी झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी या दुपदरी मार्गावरील वाहतूक कांही काळ एकेरी करण्यात आली. मात्र यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. सदर घटना घडली त्यावेळी झाडानजीक कोणी नव्हते त्यामुळे अनर्थ टळला

पावसामुळे कांही वेळातच शहराच्या अनेक भागात पाणीच पाणी झाले. पावसाचा सर्वाधिक फटका फेरीवाले व रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांना बसला. भाजीपाला व फळे भिजू नयेत यासाठी व्यापाऱ्यांना धडपड करावी लागली. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिक शहरात येत आहेत. त्यांचीही पावसामुळे गैरसोय झाली. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाल्यामुळे वाहनचालकांना काळजीपूर्वक वाहने हाकावी लागत होती. अर्धवट स्थितीत असलेल्या स्मार्ट सिटीच्या विकास कामांच्या ठिकाणी पावसामुळे चिखलाची दलदल निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातील चिखलाने माखून गेलेल्या रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागत होती.

वळीवाचा दणका-झाडं कोसळल्याने दुचाकींचे नुकसान- इस्पितळ रोड नाग शांती शो रूम समोरील घटना-

पावसाबरोबरच वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. ग्रामीण भागात कांही ठिकाणी घरांची पडझड होण्याबरोबरच छताचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्याचे समजते. शहरात अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे गटारीतील कचरा रस्त्यावर वाहू लागला होता. नरगुंदकर भावे चौक, संचयनी चौक, काँग्रेस रोड, दुसऱ्या रेल्वे गेट, ग्लोब टॉकीज समोरील रस्ता, जुना धारवाड रोड आदी रस्त्यांवर पाण्याची तळी निर्माण झाली होती.

शहर आणि परिसरातील शेतकरी रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके घेतात तसेच वांगी, कोथिंबीर, मिरची, फ्लॉवर, कोबी, कलिंगड, काकडी आदी पिकांची लागवड केली जाते मात्र सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान होत आहे. वळीव पावसाने उसंत न घेतल्यास भाजीपाला कुजून जाण्याची भीती असल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातुर बनला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.