बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर त्यांची नसबंदी करून त्यांना रॅबीज इंजेक्शन द्यावे, अशी मागणी कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कंग्राळ गल्ली, काकतीवेस रोड येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश अशोक काळे यांच्या नेतृत्वाखाली एका निवेदनाद्वारे उपरोक्त मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमार वाढली आहे.
अन्नासाठी गल्लोगल्ली भटकत फिरणारे कुत्र्यांचे कळप नागरिकांसाठी विशेष करून लहान मुले व महिलांसाठी धोकादायक ठरत आहेत. ही कुत्री अचानक एखाद्यावर हल्ला करतात. शहरात असे प्रकार वारंवार घडत असून अनेक जण कुत्र्याच्या चाव्याने जखमी झाले आहेत.
कालच कंग्राळी गल्ली येथील एका 5 वर्षीय बालकावर चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या त्या बालकावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेने देखील या भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवासमोर हात टेकले आहेत.
तेंव्हा जर या कुत्र्यांना मारता येत नसेल किंवा त्यांना अन्यत्र नेऊन सोडता येत नसेल तर त्यांची नसबंदी करण्यात यावी आणि त्यांना विष प्रतिबंधक रॅबीजचे इंजेक्शन दिले जावे, अशी आपली मागणी असल्याचे गणेश काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी काळे यांचे अन्य सहकारी उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत त्यांनी महापालिका आयुक्तांना देखील सादर केली आहे.