वादग्रस्त हालगा -मच्छे बायपास रस्ता हा सध्या दारुड्यांचा अड्डा बनला असून या ठिकाणी सुरु असलेल्या गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेतर्फे शेतकरी नेते राजू मरवे आणि प्रकाश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
आपल्या मागणी संदर्भात बोलताना राजीव मरवे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विरोधामुळे अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी मद्यपि मंडळी दररोज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालत असतात. याठिकाणी दारूच्या पार्ट्या, मटका-जुगार खेळणे, गांजा ओढणे आदी गैरप्रकार रात्रीच्या अंधारात सुरू असतात. याखेरीज अनैतिक प्रकार देखील होत असतात. हे गैरप्रकार करताना तेथील शेतीवाडीत दारूच्या बाटल्या टाकणे, अन्नाचे खरकटे, पिशव्या वगैरे केरकचरा टाकून अस्वच्छता पसरली जात आहे. दारूच्या बाटल्या शेतात फोडून टाकण्यात येत असल्यामुळे शेतकरी व महिला जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी कालच श्रमदानाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून केरकचरा काढण्याबरोबरच जवळपास एक बैलगाडीहून अधिक बियरसह इतर दारूच्या बाटल्या गोळा केल्या. दारुड्यामुळे शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असते. तरी जिल्हा प्रशासनासह पोलीस आणि अबकारी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर गैरप्रकारांना तात्काळ आळा घालावा अशी आमची मागणी आहे, असे मरवे यांनी स्पष्ट केले.
हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी सुरू असलेले गैरप्रकार थांबावेत यासाठी यापूर्वी आम्ही वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तथापि पोलिसांकडून अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही. सदर ठिकाणी दारू पार्ट्या वगैरे गैरप्रकार होण्याबरोबरच चोरीचे प्रकार देखील घडत आहेत. येथील शेतातील विहिरींवर बसवलेल्या पाण्याच्या मोटारी चोरीला जात आहेत. अलीकडेच चक्क एक जनरेटरच चोरट्यांनी लांबवला आहे, ही बाब देखील आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली आहे. हे सर्व कमी होते म्हणून की काय शहापूर, वडगाव, अनगोळ आणि येळ्ळूर शिवारातील पिकाऊ जमिनीमध्ये भूमाफियांकडून बेकायदा माती टाकण्याचे प्रकार होत आहेत.
कर्नाटक कायदा 64 च्या कलम 95 प्रमाणे कोणत्याही पिकाऊ जमिनीमध्ये असा मातीचा भराव टाकता येत नाही. तथापि हा कायदा पायदळी तुडवून शेतांमध्ये पूर परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी विघ्नसंतोषी भूमाफियाकडून पिकाऊ जमिनीमध्ये माती आणून टाकली जात आहे. हा प्रकार देखील तात्काळ थांबविण्यात यावा, अशी आमची मागणी आहे असे राजू मरवे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. सदर निवेदनाची प्रत पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अबकारी अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आली.