अकाली निधन पावलेले वृत्तपत्र छायाचित्रकार दिवंगत चेतन कुलकर्णी आणि परशराम गुंजीकर यांच्या कुटुंबाला एस. एस. फाउंडेशनतर्फे मदत वितरित करण्यात आली. तसेच मुरगोडचे आजारी पत्रकार महांतेश बाळीकाई यांच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली.
कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ एस. एस. फाउंडेशनची स्थापना केली आहे. सदर फाउंडेशनच्या उपक्रमांचा शुभारंभ काल रविवारी जिल्हा माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयांमध्ये करण्यात आला. यावेळी अकाली निधन पावलेले छायाचित्रकार दिवंगत परशराम गुंजीकर कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांच्या आई-वडिलांना वृद्धापवेतन आणि पत्नीला विधवा वेतनास मंजुरी मिळवून देण्यात आली.
तसेच गुंजीकर यांच्या तीन वर्षाच्या मुलीला एलकेजीमध्ये दाखल करण्याबरोबरच तिच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी फाउंडेशनने घेतली.
गुंजीकर यांच्याप्रमाणे दिवंगत छायाचित्रकार चेतन कुलकर्णी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याबरोबरच एस. एस. फाउंडेशनतर्फे चेतन यांच्या पत्नीला पूर्व प्राथमिक शाळा सुरू करून देण्याचे निश्चित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना फाऊंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ फाउंडेशन स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, पत्रकार विलास जोशी, माजी महापौर विजय मोरे, पत्रकार सहदेव माने आणि छायाचित्रकार डी. बी. पाटील यांनी आपल्या भाषणात कुरुंदवाडे यांच्या कार्याची प्रशंसा केली.
आपले समयोचित विचार व्यक्त करण्याबरोबरच इन बेळगावचे संपादक राजशेखर पाटील यांनी एस. एस. फाउंडेशनला वैयक्तिक 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. याप्रसंगी श्रीकांत कुबकट्टी, अरुण पाटील, पुंडलिक बाळोजी आदी बरेच पत्रकार उपस्थित होते. पत्रकार महबूब मकानदार यांनी प्रस्ताविक केले. शिवानंद तारिहाळ यांनी सर्वांचे आभार मानले.