ग्रामीण विकास आणि पंचायत राज दिनानिमित्त उद्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. पंचायतराज दिनाच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर ग्रामपंचायतींकडून विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वितरण करण्याच्या मोहिमेसह अन्य कार्यक्रमांचा समावेश असेल.
सदर मोहीम उद्या रविवारपासून 1 मे 2022 पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना अद्याप किसान क्रेडिट कार्ड मिळालेले नाही. त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना शोधून कार्ड दिले जाणार आहे. तसेच या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे.
यासाठी जिल्हा पंचायत, विविध बँकांचे प्रतिनिधी, नाबार्ड प्रतिनिधी आणि कृषी खात्याचे अधिकारी यांची बैठक घेण्याची सूचना पंचायतराज खात्याने जिल्हा पंचायतीला केली आहे.