संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या आजारी पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना प्रकृती खालावल्यामुळे केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लक्ष्मी बेन्नाळकर यांची पेन्शन देखील गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे बेन्नाळकर यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबतची माहिती मिळताच महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथील श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना 50 हजार रुपयांची मदत देऊ केली. मंत्री शिंदे यांचे सहाय्यक आणि मुंबईतील शिवसेनेचे आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी आज गुरुवारी केएलई हॉस्पिटलला भेट देऊन लक्ष्मीताई बेन्नाळकर यांची विचारपूस केली. तसेच त्यांच्यावरील उपचारासाठी बेन्नाळकर कुटुंबीयांकडे 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
याप्रसंगी मारुती बेन्नाळकर यांची कन्या इंदुमती, नातू जितेश मेणसे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी, म. ए. समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर, शिवसेनेचे दिलीप बैलुरकर, राजकुमार बोकडे, आर. आय. पाटील किसन सुंठकर आदींसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, शिवसैनिक आणि समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
लक्ष्मी बेन्नाळकर यांना उपचारासाठी आर्थिक मदत देऊ केल्यानंतर बेळगाव लाइव्हशी बोलताना शिवसेना आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की, सीमा लढ्यातील पहिले हुतात्मे मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर आजारी असल्याचे तसेच महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी पेन्शन बंद झाल्याने त्यांचे हाल होत असल्याचे समजताच सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ मला बेळगावला जाऊन बेन्नाळकर यांची योग्य ती व्यवस्था लावून देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची मदत देखील देऊ केली आहे. त्यानुसार मी आज बेळगावात येऊन लक्ष्मीताई यांची भेट घेऊन विचारपूस केली आणि मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढे देखील उपचारासाठी आवश्यकता भासल्यास आम्ही बेन्नाळकर यांना आणखी आर्थिक मदत करू, असे चिवटे यांनी स्पष्ट केले.
लक्ष्मीताई बेन्नाळकर यांची महाराष्ट्र शासनाकडून मिळणारी पेन्शन गेल्या दोन वर्षापासून बंद आहे. त्यामुळे आता सर्वप्रथम त्यांची पेन्शन पूर्ववत सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. तसेच या महिन्याभरात पेन्शन सुरू होईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही मंगेश चिवटे यांनी सांगितले.
लक्ष्मी बेन्नाळकर यांचे नातू जितेश मेणसे यांनी यावेळी बोलताना गेल्या जून 2020 पासून शासनाकडून आपल्या आजीला मिळणारी पेन्शन बंद झाली असल्याचे सांगितले. पेन्शन बंद झाल्यापासून माझी आजी मनस्तापाने आजारी पडली आहे असे सांगून पेन्शन सुरू व्हावी यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. मात्र अद्यापही पेन्शन सुरू होण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.