शिवजयंती उत्सव उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती बेळगांवचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी केले आहे.बेळगावातील पोलीस समुदाय भवनामध्ये आज शिवजयंती उत्सवाची पूर्वतयारीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, डीसीपी रवींद्र गडादी, डीसीपी पीव्ही स्नेहा आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले की, कर्नाटकातील बेळगावात शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येते. यासाठी गेल्या एक महिन्यापासून पूर्वतयारी सुरु आहे. मिरवणुकीच्या दिवशी सर्वांची जबाबदारी आहे की, कोणालाही नाहक त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी आणि प्रत्येक देखाव्यासोबत कार्यकर्त्यांसोबत एक पोलीस तैनात असेल. पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या सहयोगाने ही मिरवणूक अनुचित प्रकाराला वाव न देता काढावी. काही गोंधळ निर्माण झाल्यास स्थानिक पातळीवर त्यावर मार्ग काढावा.
मिरवणुकीच्यावेळी पोलीस फौजफाटा वाढविण्यात येईल. तसेच ध्वनी प्रदूषण आणि प्रक्षोभक संदेश देणारे देखावे सादर करू नयेत. जर काही समस्या असतील तर त्या पोलिसांच्या निदर्शनास आणा, असे आवाहन त्यांनी केले.
यासंदर्भात शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी अनेक सल्ला – सूचना दिल्या. यावेळी शिवजयंती चित्ररथ समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस शहापूरकर, रोहन जाधव, मेघन लंगरकांडे, विशाल चौगुले, शरद पाटील, श्याम बादनकर, विनायक बावडेकर, संजय जाधव, ओंकार होनगेकर, संजय पाटील व इतर उपस्थित होते.