कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असतानाच केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसच्या इतर नेतेमंडळींनी आज मंगळवारी सकाळी मयत संतोष पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच त्यांना पक्षाच्या वतीने 11 लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. याखेरीज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांनीही वैयक्तिक 5 लाख रुपयांची मदत देऊ केली हे विशेष होय.
सध्या राज्यभरात बेळगाव तालुक्यातील बडस गावचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, आदी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी बडस गावी जाऊन मयत संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीप्रसंगी नेतेमंडळींनी शोकाकुल पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच डी. के. शिवकुमार यांनी यावेळी पक्षाच्यावतीने संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना 11 लाख रुपयांची मदत देऊ केली.
त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी यांनी वैयक्तिकरीत्या 5 लाख रुपयांची मदत पाटील कुटुंबीयांना दिली. या पद्धतीने मयत संतोष पाटील यांच्या कुटुंबाला आज एकूण 16 लाख रुपयांची मदत देण्यात आली
केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कंत्राटदार संतोष पाटील याच्या आत्महत्येनंतर लगेचच पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन 11 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसात आपल्या आश्वासनाची पूर्तता करताना आज त्यांनी शोकाकुल पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करून पक्षाच्यावतीने त्यांच्याकडे 11 लाखाचे आर्थिक सहाय्य सुपूर्द केले.
याप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.