मेन रोड समर्थनगर येथे आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी संप्रदायीक पारायण सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेली ग्रंथ दिंडी नुकतीच भक्तिभावाने पार पडली.
शहरातील समर्थनगर मेन रोड येथे आज शनिवारपासून येत्या सोमवार दि. 25 एप्रिलपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त समर्थनगर परिसरात काल शुक्रवारी ग्रंथदिंडी काढण्यात आली.
यावेळी श्री विठ्ठल रखुमाई आणि श्री ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये विराजमान करण्यात आल्या होत्या. श्री रेणुका मंदिर समर्थनगर कॉर्नर येथून काल सायंकाळी 4 वाजता दिंडीला सवाद्य प्रारंभ झाला. दिंडीच्या अग्रभागी डोक्यावर मंगलकलश घेऊन जाणाऱ्या सुहासिनी आणि भजनी पथक होते.
वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीमध्ये भगवे फेटे परिधान करून सहभागी झालेल्या महिला व युवती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. दिंडीमध्ये वारकरी मंडळींसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
समर्थनगर येथील प्रमुख मार्गावरून फिरून दिंडीची पारायण स्थळी सांगता झाली. यंदा प्रथमच समर्थनगर येथे या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.