व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 203 रुपयांची भरघोस वाढ झाली असून या पद्धतीने महागाई वाढत गेली तर येत्या काळात हॉटेल्समधील पदार्थांचे दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे मत हॉटेल चालकांमध्ये व्यक्त होत आहे.
वाढत्या महागाईमुळे हॉटेल्समधील पदार्थांचे दर कांही महिन्यांपूर्वी वाढविण्यात आले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरचा जर अधिकाधिक प्रमाणात वाढल्याने हॉटेल्समधील पदार्थांच्या दरात मोठी वाढ होण्याचा कयास असून एक दोन दिवसात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे अनेक महिने हॉटेल्स बंद होती. त्यामुळे हॉटेलचालक अगोदरच आर्थिक संकटात असताना दिवसेंदिवस महागाई वाढत असल्यामुळे हॉटेलमधील पदार्थांचे दर वाढवावे लागत आहेत. मात्र नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी अधिक प्रमाणात दर वाढवला जात नसला तरी अशाच प्रकारे महागाई वाढत गेली तर येणाऱ्या काळात पुन्हा दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही, असे मत हॉटेल चालकांमध्ये व्यक्त होत आहे.
हॉटेलमधील चहापासून ते जेवणापर्यंतचे दर वाढले तर सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे दरवाढ होऊ नये अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय सालीयन यांनी दोन वर्षापासून हॉटेल चालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे रात्री 12:30 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी मागितली आहे. कोरोनामुळे हॉटेल चालक दोन वर्षापासून संकटात असल्याने सरकारने त्यांना सवलत देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे.