कोरोना संसर्ग घटल्यामुळे देशातील विविध राज्यात त्याबाबतचे निर्बंध उठवण्यात आले असून कर्नाटकातही निर्बंध मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनाची नियमित माहिती मीडिया बुलेटीन माध्यमातून देण्यात येत होती. ती माहिती पाठविणे आता बंद करण्यात आले आहे.
देशात सलग दोन वर्षे कोरोनाचा संसर्ग राहिला. कोरोनाचा जीवघेणा प्रादुर्भाव लक्षात घेत लॉक डाऊन घोषित करण्यात आले होते. त्याचे खूप गंभीर आणि भीषण परिणाम झाले. विविध सेवा आणि व्यवसाय बंद ठेवावे लागले. यात आर्थिक उलाढाल, व्यवहार, कामकाज आणि व्यापार -उद्योग बंद राहिले. अनेकांना रोजगार गमवावा लागला. मात्र आता स्थिती सुधारली आहे. कोरोना बाधितांचे आकडे कमी झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे.
विविध राज्यातील कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांचाही समावेश आहे. कर्नाटकातही त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र निर्णय अजून प्रलंबित आहे. त्याचाच भाग म्हणून कांही दिवसांपासून जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यातर्फे वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांना पाठविण्यात येणारे कोरोना संदर्भातील मीडिया बुलेटीन बंद करण्यात आले आहे.
मीडिया बुलेटीनमध्ये मागील 24 तासातील कोरोना बाधित, उपचाराधीन रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण याचा तपशील पाठविला जात असे तर दुसरीकडे कोरोना बळी, दिवसभरातील चांचण्या आणि संसर्गचे प्रमाण याचाही तपशील असायचा.
त्यावरून प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात यायची. संसर्ग घटल्यामुळे मीडिया बुलेटीन माध्यमातून तपशील पाठविणे आता थांबविण्यात आल्याचे दिसून येत आहे.