अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे आयोजित तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखेतर्फे येत्या आठ मे दोन हजार बावीस रोजी तिसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे खानापूर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज नजीकच्या मराठा मंदिर सभागृहांमध्ये हे संमेलन होणार आहे. मराठी भाषिकांची स्वायत्तता आणि विकासासाठी हे साहित्य संमेलन प्रेरणादायी ठरावे यासाठी मी स्वतः आवर्जून या संमेलनाला उपस्थित राहणार आहे, असे भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने या संमेलनाला हजेरी लावावी, असे आवाहनही केले असल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील आणि बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी कळविले आहे.