बेळगाव महापालिकेकडून अखेर सदाशिनगर स्मशानभूमीतील दाहिनीवरील शेडची दुरूस्ती करून नवे पत्रे घालण्यात आले आहेत. याची माहिती मिळताच आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शेडला भेट देऊन कामाची पाहणी केली.
सदाशिनगर स्मशानभूमीतील दाहिनीवरील शेडचे पत्रे खराब झाल्याने त्याचे अवशेष लोंबकळत होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला होता.
याबाबत वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्मशानभूमीची पाहणी करून शेडवर नवे पत्रे घालण्याची सूचना दिली होती. त्यानुसार महापालिकेने तातडीने तेथील पत्रे हटविण्याचे काम हाती घेऊन दोन आठवड्यात नवे पत्रे घातले आहेत. या कामाची आमदार ॲड. बेनके यांनी काल बुधवारी पाहणी केली.
सदाशिनगर स्मशानभूमीत सर्वाधिक अंत्यसंस्कार होतात. कोरोना काळात ही आकडेवारी वाढल्यामुळे वाहिन्यांवरील शेडची दुरावस्था झाली होती. मात्र आता नवे पत्रे घालण्यात आल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यापूर्वी 2017 मध्ये या स्मशानभूमीत अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन महापौर संज्योत बांदेकर व उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी तातडीने नवे पत्रे बसवून घेतले होते.