कर्नाटक राज्य सरकारने अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चून खत उद्योग सुरू करण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी दावणगिरी, बेळगाव आणि मंगळूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे, अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी ही माहिती दिली.
मंगळूर येथे काल सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री निराणी बोलत होते. स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावसह कांही ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
खत प्रकल्पाच्या उभारणीसाठी मंगळूरला प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पामुळे 10 हजार लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतील आणि केंद्र सरकारच्या मदतीने उद्योग उभारले जातील. कर्नाटकातील खताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ही योजना आ,हे असे मंत्री मुरुगेश निराणी यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार येत्या 2 ते 4 नोव्हेंबर दरम्यान बेंगलोर येथे ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स मिट’ आयोजित करत आहे. गुंतवणूकदारांच्या मेळाव्याचा एक भाग म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये ‘रोड शो’ आयोजित करू.
सरकार एमबीए, एमटेक पदवीधरांना स्टार्टअपसाठी प्रोत्साहन देईल. पहिला कार्यक्रम गुलबर्गा, बंगळूर आणि बेळगाव येथे आयोजित केला जाईल, अशी माहितीही अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली.