12 डिसेंबर 2021 रोजी बेळगावात झालेल्या महामेळाव्याच्या आणि 3 जानेवारी समिती बैठकीतील ठरावा नुसार बेळगाव सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक तातडीने बोलवावी अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची शनिवारी कोल्हापूर मुक्कामी समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली.त्यावेळीं त्यांनी तातडीनं उच्चाधिकार समितीची बैठक घ्या अशी मागणी केली.
समितीने अश्या मागणीचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहिले आहे.सध्या कर्नाटक शासनाने मराठी भाषका वर जोरदार दडपशाही चालू केली आहे मराठी संघटनावर बंदी घालण्याची भाषा केली जात आहे अश्या सर्व गोष्टी उच्चाधिकार समितीच्या कानावर घालणे गरजेचे आहे.या समस्यांवर उपाय म्हणजे तात्काळ कोल्हापूर किंवा मुंबईत उच्चधिकार समितीची बैठक घ्या अशी मागणी समितीने पवार यांच्या कडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर कडक शासन व्हावे,अश्या घटना टाळाव्यात आरोपीवर देश द्रोहाचा गुन्हा घाला अशीही मागणी त्यांनी ठरावा द्वारे केली आहे.
शिवराय अवमान विरोधी आंदोलनात कारावास भोगलेल्या मराठी तरुणांना मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून मदत होत आहे.समितीवर बंदी घालण्याच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध ही या पत्रात करण्यात आला आहे.यावेळी दीपक दळवी सह प्रकाश मरगाळे, विकास कलगटगी महेश जुवेकर आदी उपस्थित होते.