बेळगाव सकल मराठा समाजातर्फे पुढील महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य गुरुवंदना समारंभाच्या अनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी ख्यातनाम कला दिग्दर्शक व निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांची एन. डी. स्टुडिओ येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांच्या सानिध्यात येत्या 15 मे 2022 रोजी बेळगाव येथे भव्य गुरुवंदना समारंभ होणार आहे.
त्या अनुषंगाने बेळगावच्या सकल मराठा समाजातर्फे किरण जाधव यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी एन. डी. स्टुडिओ येथे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक व निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांची भेट घेतली.
यावेळी किरण जाधव यांनी निर्माते देसाई यांचा पुष्पहार व शाल घालून सत्कार केला. त्याचप्रमाणे बेळगाव येथे आयोजित गुरुवंदना समारंभासाठी उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यासपीठाला संदर्भात नितीन देसाई यांच्याशी चर्चा केली. सदर गुरुवंदना समारंभास कर्नाटक व महाराष्ट्रातील मराठा समाजातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहनही किरण जाधव यांनी केले.
याप्रसंगी बेळगाव सकल मराठा समाजाचे योगी बिरादार, सागर पाटील, अक्षय साळवी, चेतन नंदगडकर, विशाल कंग्राळकर आदी उपस्थित होते.