पोलिसांकडून विनाकारण अर्वाच्य शिवीगाळ करून त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करत संताप मुस्लिम समुदायाच्या लोकांनी एपीएमसी पोलिस ठाण्याला घेराव घालून निदर्शने केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार काल गुरुवारी रात्री कांही पोलिसांनी अंजनेयनगर मुख्य रस्त्यावर असलेली लहान लहान दुकाने अर्वाच्य शिवीगाळ करत जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडली. तेंव्हा सामाजिक कार्यकर्ते इमरान फत्तेखान यानी त्या पोलिसांना जाब विचारला.
त्यावेळी संबंधित पोलिसांनी त्यांच्याशी देखील अरेरावीची वर्तन करून दमदाटी केली. या घटनेच्या निषेधार्थ आज शुक्रवारी नमाज पढून होताच अंजनेयनगर येथील मुस्लिम नेत्यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एपीएमसी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी जाऊन घेराव घातला आणि जोरदार निदर्शने केली.
यावेळी युक्रिया मशिदीचे अध्यक्ष अकबर बागवान यांनी पीएसआय मंजुनाथ यांच्याशी चर्चा केली. आम्ही मुस्लिम बांधव पोलिस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करत असतो. सध्या आमचा रमजान सण सुरू आहे, अशा परिस्थितीत कांही पोलिस आमच्या भागात येऊन नागरिकांना विनाकारण त्रास देत आहेत.
अर्वाच्य शिवीगाळ करत आहे. तेंव्हा या प्रकाराला आळा घालून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी बागवान यांनी केली. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आपले आंदोलन मागे घेतले.