कोर्टाची साक्ष संपवून गावी परत जातेवेळी शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान हाणामारीसह तलवार व चाकू हल्ल्यात होऊन एकाचा खून तर 5 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सांबरा केंबल फॅक्टरी नजीक घडली. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
मुदकाप्पा चंद्रप्पा अंगडी (वय 25, रा. सुनकुप्पी, ता. बैलहोंगल) असे चाकू हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे. त्याचप्रमाणे विशाल मारुती बागडी (रा. मारीहाळ), सुनील अर्जुन अरबळ्ळी व राजू सुरेश अरबळ्ळी (दोघे रा. कर्डीगुद्दी) अशी जखमींची नावे आहेत.
त्यांच्यासमवेत आणखीन दोघेजण जखमी झाले असून सर्व जखमींना जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे दोडप्पा गंगप्पा अरबळ्ळी, लक्कप्पा बसप्पा हळ्ळी, बसवराज गंगप्पा अरबळळी आणि बसवंत बसवन्नी करवीनकोप्प अशी आहेत.
याबाबतची माहिती अशी की, मुदकाप्पा अंगडी हा काल गुरुवारी सायंकाळी कोर्टामधील आपली साक्ष संपवून सहकाऱ्यांसमवेत बोलेरो गाडीतून परत गावाकडे जात होता. त्यावेळी केंबल फॅक्टरीनजीक मुदकप्पाला काहीजण ओळखीचे दिसले त्यामुळे त्याने बोलेरो थांबविली यावेळी तो कांही जणांशी बोलत थांबला असता एकाने त्यांच्याशी काय बोलतोस? म्हणुन शिवीगाळ केली. त्यानंतर वाढत गेलेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यावेळी अचानक तलवार आणि चाकूने मुदकप्पा याच्यावर वार करण्यात आले. मुदकप्पाला वर्मी घाव झाल्याने तो खाली कोसळला आणि गतप्राण झाला या झटापटीत याचे इतर सहकारी जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच मारीहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बसापुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा इस्पितळात हलविला. त्याचप्रमाणे पुढील दोन तासातच संशयितांना गजाआड केले. याप्रकरणी मारीहाळ पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.