बेळगाव टिळकवाडी पोलिसांनी दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना गजाआड करून त्यांच्याकडील दीड लाख रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या.
गिरीश प्रभूनट्टी (वय 19 मुळ रा. मेलट्टी -गोकाक, सध्या रा. झाडशहापूर बेळगाव) आणि प्रभुपाद बाळकृष्ण चौगुले (वय 25, रा. बसवन कुडची बेळगाव) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
टिळकवाडी येथील कांता अपार्टमेंटच्या वॉचमन संतोष काकी याने अपार्टमेंटच्या बेसमेंटमधील दुचाकींची चोरी झाल्याची तक्रार 27 एप्रिल रोजी दाखल केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन तपास चक्रे फिरवत टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी उपरोक्त दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले.
तसेच त्यांच्याकडील सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.