चन्नम्मानगर मुख्य रस्त्यावर राणा प्रताप रोड कॉर्नर येथील देशपांडे बंगल्यासमोरील एक निष्पर्ण वाळवी लागलेल्या कधीही कोसळेल अशा धोकादायक अवस्थेत असलेला वृक्ष तात्काळ हटविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
क्लब रोड येथे जुनाट वृक्ष कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा बळी गेल्यामुळे शहरातील धोकादायक व जुनाट वृक्ष हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. चन्नम्मानगरच्या मुख्य रस्त्यावर दिवस-रात्र नेहमी रहदारी असते.
राणा प्रताप रोड कॉर्नर येथील जुनाट वृक्षाच्या ठिकाणी रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला खांबावर उच्च दाबाची वीज वाहिनी आहे. संबंधित निष्पर्ण वाळवी लागलेला जुनाट वृक्ष इतक्या धोकादायक अवस्थेत आहे की तो केव्हा कोसळेल याचा नेम नाही त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी सदर वृक्ष तात्काळ हटवा अशी जोरदार मागणी वाहनचालकांनी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
बेळगाव शहरांमध्ये दररोज दुपारनंतर सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर सुरू आहे. ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि विजा कडाडत कोसळणार्या पावसामुळे रस्त्याशेजारी असलेली जुनी झाडे कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलनजीक 20 -25 दुचाकींचे नुकसान झाले.
त्याचप्रमाणे क्लब रोड येथे एका इसमाचा झाड पडून नाहक मृत्यू झाला होता. ही परिस्थिती पाहता किमान पावसाळ्यापूर्वी वनखाते, महानगरपालिका आणि हेस्काॅम या तिन्ही विभागांनी एकत्रितपणे जुनाट वृक्ष हटविण्यात बरोबरच वृक्षांच्या धोकादायक फांद्या तोडाव्यात, अशी जोरदार मागणी केली जात आहे.