के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित दुसऱ्या शेट्टी स्मृती चषक टी -20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आज अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रतिस्पर्धी साईराज वॉरियर्स संघावर 5 धावांनी शानदार विजय मिळवला.
कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर आज गुरुवारी साईराज वॉरियर्स आणि अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स या संघांमध्ये स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला गेला. अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकात 9 गडी बाद 134 धावा काढल्या. त्यांच्या ज्ञानेश होनगेकर (1 चौ., 3 ष.सह 29 धावा), संतोष सुळगे -पाटील (3 चौ. 29), स्वप्निल येळवी (26) आणि परीक्षेत वकुंद (14) यांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. साईराजच्या दीपक राक्षे याने 16 धावात सर्वाधिक 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल फलंदाजी करताना साईराज वारियर्स संघाला मर्यादित 20 षटकात 5 गडी बाद 129 धावा काढता आल्या. त्यांच्या हबीब ताडपत्री (7 चौ., 2 ष.सह 64) सुधन्व कुलकर्णी (4 चौ. 29) आणि ओमकार वेर्णेकर (15) यांनी संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हुबळी संघाच्या नंदकुमार मलतवाडकर आणि संतोष सुळगे -पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या पद्धतीने अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 5 धावांनी विजय संपादन करून अजिंक्यपद मिळविले. अंतिम सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाचा संतोष सुळगे -पाटील हा ठरला.
अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, उद्योजक व काँग्रेस नेते राजू शेठ, मिहीर पोतदार, निखिल पोतदार, राहुल सतीश जारकीहोळी, सर्वोत्तम जारकीहोळी, राकेश कलघटगी, हर्ष जॉन, संजय बेळगावकर आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेता आणि उपविजेत्या संघाला आकर्षक करंडक तसेच आकर्षक वैयक्तिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील मालिकावीर किताब विजेत्या नरेंद्र मांगुरे (साईराज वॉरिअर्स) याला दुचाकी बक्षिसादाखल देण्यात आली.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे आहेत. उत्कृष्ट फलंदाज -स्वप्निल येळवी, उत्कृष्ट गोलंदाज -रब्बानी दफेदार, उदयोन्मुख खेळाडू -ओमकार वेर्णेकर, उत्कृष्ट इम्पॅक्ट प्लेअर -वैष्णव संघमित्रा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -संतोष सुळगे -पाटील, उत्कृष्ट झेल -ओमकार वेर्णेकर, सर्वाधिक षटकार -ज्ञानेश होनगेकर, सामन्यातील इम्पॅक्ट प्लेयर -दीपक राक्षे, अंतिम सामन्यातील सामनावीर -संतोष सुळगे -पाटील, मालिकावीर -नरेंद्र मांगुरे.