बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या 24 एप्रिल रोजी भारत, इराण आणि जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हे मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत.
कोल्हापूरच्या खासबाग मैदान आखाड्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नामवंत आखाडा म्हणजे बेळगावचा आनंदवाडी आखाडा होय. या आखाड्याची आसन व्यवस्था अशी आहे की मैदानातील कोणत्याही जागेवरून कुस्ती शौकिनांना कुस्ती स्पष्टपणे पाहता येते.
सदर 20 ते 25 हजार प्रेक्षक क्षमतेच्या आनंदवाडी आखाड्यात बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या 24 एप्रिल रोजी भारत, इराण आणि जॉर्जिया येथील मातब्बर मल्लांचा सहभाग असणाऱ्या जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मैदानासाठी आनंदवाडीचा आखाडा तयार करण्यात येत असून आज शुक्रवारी जेसीबीद्वारे नवी माती टाकून सपाटीकरण तसेच मुख्य कुस्ती मैदान व्यवस्थित करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्याचप्रमाणे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाढलेली झाडेझुडपे व गवताचे रान काढून प्रेक्षक गॅलरीसह संपूर्ण आखाडा स्वच्छ केला. याप्रसंगी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, उपाध्यक्ष अप्पय्या अप्पन्नावर, सेक्रेटरी ॲड. सुधीर बिर्जे, उपसेक्रेटरी ज्योतिबा हुंदरे, खजिनदार शिवाजी पाटील, ए. जी. मंतुर्गी, बाळाराम पाटील, बाहुबली पाटील, चेतन बुद्दण्णावर, सुहास पाटील, अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या रविवार दि. 24 एप्रिल रोजी आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात ‘बेळगाव केसरी’ या मानाच्या कुस्तीसाठी पै भूपेंद्रसिंग अंजना (पंजाब) आणि जाॅर्जी जॉर्जिया यांच्यात तुफानी लढत होणार आहे. ‘बेळगाव मल्लसम्राट’ किताबासाठी पै. सिकंदर शेख (ता. गंगावेस) विरुद्ध पै. प्रदीप सिंग (स्पेंडर) पंजाब अशी लढत होणार आहे. त्याचप्रमाणे ‘दर्शन केसरी’ किताबासाठी पै. विशाल हरियाणा विरुद्ध महारुद्र काळेल (ता. कुर्डुवाडी) अशी कुस्ती होणार आहे. कुस्ती मैदानातील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या कुस्त्या अनुक्रमे पै. कार्तिक काटे दावणगिरी विरुद्ध पै. सिना इराण आणि पै. संगमेश बिरादार विरुद्ध पै. निकेतन पाटील (ता. कुर्डुवाडी) अशा होणार आहेत.
याव्यतिरिक्त या कुस्ती आखाड्यात सुमारे 80 हून अधिक लहान -मोठ्या काटा कुस्त्या जोडलेल्या आहेत. तरी कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने या कुस्ती मैदानाचीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुस्तीगीर संघटनेचे सेक्रेटरी ॲड. सुधीर हनुमंतराव बिर्जे यांनी केले आहे.