सरकारी कामकाजात पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्यांना एका क्लिक वर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाची माहिती मिळावी यासाठी संकेतस्थळाची निर्मिती केली जाते. त्यानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीकडून जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीची माहिती मिळावी यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असली तरी मागील 6 वर्षांपासून त्यावर नवी माहितीच अपडेट झाली नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्हा पंचायतीकडून 2013 साली ‘zpbelgaum.nic.in’ या नावाने संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय माहिती केंद्राकडे (एनआयसी) संकेतस्थळावरील माहिती अपलोड करण्याची जबाबदारी आहे. बेळगाव तालुका पंचायत कार्यालयात यासाठी एनआयसी केंद्राचे कक्ष आहे.
तथापि गेल्या 2015 सालापासून हे संकेतस्थळ अपडेट झालेले नाही. त्यावर केवळ जिल्हा पंचायतीचे नवे सीईओ आणि पंचायत सदस्य निवडून आल्यानंतरचे फोटो अपडेट झाले आहेत. मध्यंतरीच्या काळात संकेतस्थळावर पुनर्नामांकन करण्यात आले. बेळगावचे ‘बेळगावी’ असे केले गेले. मात्र त्या व्यतिरिक्त संकेतस्थळावर कोणताही बदल पहावयास मिळाला नाही.
संकेतस्थळावर जिल्हा पंचायतीच्या सर्व साधारण सभा, स्थायी समिती बैठका, अर्थसंकल्प, लेखाजोखा, पंचायती संबंधित आदेश, तक्रारी आदी सर्व माहिती उपलब्ध करून दिली जात होती. केवळ माहितीच्या अधिकाराखाली नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना केंव्हाही जिल्हा पंचायतीची माहिती घरबसल्या मिळावी, पंचायत कामात पारदर्शकता राखली जावी यासाठी जिल्हा पंचायतीचे संकेतस्थळ सुरू केले होते.
जिल्हा पंचायतीकडून एनआयसीला माहिती दिल्यानंतर ती संकेतस्थळावर लगेच अपडेट केली जाते. तथापि माहितीच दिली जात नसल्यामुळे गेल्या 6 वर्षांपासून बेळगाव जिल्हा पंचायतीच्या संकेतस्थळावरील माहिती अपडेट झालेली नाही.