बेळगाव शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून कोनवाळ गल्ली, कुलकर्णी गल्ली पाटील मळा आदी परिसरात गेल्या गेल्या 15 दिवसापासून नळाला पिण्याच्या पाण्याचा पत्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊन हाल होत आहेत.
शहरातील रामलिंग खिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, शेरी गल्ली, कुलकर्णी गल्ली, पाटील मळा, मुजावर गल्ली या भागात गेल्या 12-15 दिवसांपासून नळाचा पाणीपुरवठा जवळजवळ बंद झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची विशेष करून गृहिनीवर्गाची मोठी गैरसोय झाली आहे. पिण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. याठिकाणी सरकारी नळ देखील आहेत. परंतु पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ते देखील कोरडे पडले आहेत.
नळाला पाणी येत नसल्यामुळे या भागातील लोकांना बोरच्या अर्थात कूपनलिकेच्या पाण्यावर आपली गरज भागवावी लागत आहे. मात्र त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या भागात टँकरने देखील पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिणामी स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी बहुतांश नागरिकांना पैशाचा भुर्दंड सहन करून बाजारातून विकतचे पाणी आणावे लागत आहे.
तरी या भागाच्या लोकप्रतिनिधींसह महापालिका तसेच एल अँड टी कंपनीच्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन उपरोक्त भागात युद्धपातळीवर पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.