काकती नजीकच्या हॉटेल फेअरफिल्ड मेरिओट या हॉटेलवर गंभीर आरोप करण्यात आला असून सदर खाजगी हाॅटेलमधून सुमारे 10 लाख रुपये किंमतीच्या हिऱ्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी एका महिलेने काकती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हरियाणा राज्यातील गुडगाव येथील शिप्रा बिजावत या बेळगाव जवळील महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द येथील साखर कारखान्यांमध्ये मानव संसाधन (एचआर) म्हणून काम करतात.
गेल्या मंगळवारी त्या हरियाणाहून साखर कारखान्याला जाण्यासाठी आल्या होत्या. काकती नजीकच्या हॉटेल फेअरफिल्ड मेरिओटमध्ये आपल्या खोलीत सामान ठेवून सकाळी 10च्या सुमारास त्या बाहेर पडल्या. कारखान्यातील काम आटोपून रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास शिप्रा हॉटेलमध्ये परतल्या असता त्यांना त्यांची बॅग उघडी दिसली. त्यांनी बॅग तपासल्यानंतर जवळपास 10 लाख किंमतीच्या हिरेजडीत बांगड्या चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तेंव्हा त्यांनी याबाबत हॉटेलच्या व्यवस्थापनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये त्या दिवशी दुपारी 3 च्या सुमारास शिप्रा बिजावत राहत असलेल्या खोलीत एक महिला आणि एक पुरुष फिरताना दिसले आहेत.
दरम्यान या घटनेसंदर्भात शिप्रा बिजावत यांनी ट्विटरवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बेळगाव येथील फेअरफिल्ड मॅरिओट हॉटेलचा माझा अनुभव अतिशय खराब असून एक ग्राहक म्हणून या हॉटेलच्या बाबतीत माझ्या मनात आणि हृदयात असलेली उत्कृष्ट हॉटेलची प्रतिमा मलीन झाली आहे. माझ्या गैरहजेरीत हॉटेलच्या माझ्या रूममध्ये अतिक्रमण केले जात होते. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून माझी रूम इतर पाहुण्यांना वापरण्यास दिली जात होती असे त्यांनी म्हंटले आहे.
पोलिसांमध्ये दिलेले आपल्यात तक्रारींमध्ये शिप्रा बिजावत यांनी म्हंटले आहे की, त्यांना दिलेल्या हॉटेलच्या रूम नं. 219 मध्ये 15 मार्च रोजी सकाळी 10 च्या सुमारास आपले सामान ठेवून त्या राजगोळी खुर्द येथील साखर कारखान्याला भेट देण्यास गेल्या आणि रात्री 10:30 वाजता पुन्हा परत आल्या. त्यावेळी रूममध्ये टॉवेल, बेडशीट आणि स्नानगृह देखील वापरण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परवानगीविना ज्या व्यक्तींनी शिप्रा यांच्या रूममध्ये प्रवेश केला होता, त्यांनी आंघोळ केल्यानंतरचा ओला टॉवेल खुर्चीवर वाळत टाकला होता.
टॉवेलच्या ओलसरपणा वरून नुकतेच कोणीतरी शॉवरखाली आंघोळ करून निघून गेल्याचे स्पष्ट होत होते. त्यानंतर शिप्रा यांनी तात्काळ मॅरियट हॉटेलच्या व्यवस्थापनाला याबाबतची माहिती दिली. प्रारंभी व्यवस्थापनाने कोणीतरी माझ्या रूममध्ये प्रवेश केला होता या शिप्रा यांच्या आरोपांचा इन्कार केला. मात्र सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये तपासणी केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने आपल्या हाउसकीपिंग कर्मचाऱ्याने एका जोडप्याला दुपारी 3 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान त्यांची रूम वापरण्यास दिली होती हे मान्य केले.
यासंदर्भात शिप्रा बिजावत यांनी काकती पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. शिप्रा बिजावत यांनी मौल्यवान हिरेजडित बांगड्या चोरीच्या प्रकारात हॉटेल व्यवस्थापनाचा हात असल्याचा संशय देखील व्यक्त केला आहे.