बेळगाव लाईव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतातून युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. काही विद्यार्थ्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करून भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहे. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थी युद्धग्रस्त भागात अडकले आहेत. आपल्या मायदेशी सुखरूप परतण्याच्या आशेने भारत सरकारकडे याचना करत आहेत.
भारतात शिक्षणाच्या इतक्या चांगल्या सोयीसुविधा असूनही हे विद्यार्थी प्रदेशात शिक्षणासाठी जाण्याचे कारण म्हणजे भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आणि याठिकाणी वैद्यकीय जागेसाठी असलेल्या अत्यंत कमी जागा. वैद्यकीय प्रवेशासाठी भारतात ‘नीट’ परीक्षेला सामोरे जावे लागते मात्र युक्रेनमध्ये थेट प्रवेश देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल प्रदेशाकडे अधिक असतो.
युक्रेनमध्ये जवळपास १८ हजार भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यापैकी काही विद्यार्थी युद्धाची चाहूल लागल्यावरच परतले आहेत. आणि अद्यापही काही विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन गंगा’ च्या माध्यमातून आणण्यात येत आहे.
या साऱ्या खटाटोपानंतर भारतीय विद्यार्थी आपल्या मायदेशी परतले आहेत. परंतु ज्या कारणासाठी ते परदेशात गेले ते कारण मात्र सध्या साध्य होऊ न शकल्याने विद्यार्थी पुन्हा एका नव्या पेचात अडकले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील प्रज्वल तिप्पण्णावर या विद्यार्थ्याने आपल्यासमोर आवासून उभ्या असलेल्या समस्येविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणाचा खर्च कमी असल्याने तसेच भारतात असलेल्या कमी जागांमुळे आपण युक्रेनमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तेथे उद्भवलेली युद्ध परिस्थिती आणि आपली झालेली सुखरूप सुटका.. यानंतर आता पुढील शिक्षणाचा प्रश्न आवासून उभा असल्याचे प्रज्वलने सांगितले. आपल्याला पुढील अभ्यासासाठी भारत सरकारने सोय करून द्यावी तसेच युक्रेनमध्ये ज्या शुल्कात शिक्षण दिले जाते त्या खर्चातच शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती त्याने सरकारकडे केली आहे.
युक्रेनमधील टर्नोपील नॅशनल कॉलेजमध्ये चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रज्वलने आपला जीव वाचवत युक्रेनमधून मायदेशी धाव घेतली आहे. मुंबई मार्गे आपल्या निवासस्थानी पोहोचलेल्या प्रज्वलची भेट स्थानिक आमदार आणि नेत्यांनी घेतली असता त्याने आपल्यासमोर भविष्यात असणाऱ्या अडचणींची माहिती देत पुढील शिक्षणासाठी सरकारने संधी द्यावी, कमी शुल्क आकारून शिक्षण पूर्ण करायला मिळावे, अशी विनंती केली आहे.