Monday, May 20, 2024

/

‘हे’ अवैध प्रकार थांबवा : जाधवनगरवासियांची मागणी

 belgaum

आमच्या घरासमोर एनसीसी ग्राउंडवर खुलेआम धूम्रपान आणि मद्यपानासारखे अवैध प्रकार करणाऱ्या लोकांसह या ठिकाणी किराणा दुकान चालवणार्‍या जोडप्यावर तात्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधवनगर येथील रहिवाशांनी ठिकाण निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत येणाऱ्या जाधवनगर येथील एनसीसी ग्राउंड या मैदानावर अवैध प्रकार घडत असून याबाबत येथील रहिवाशांनी वारंवार आवाज उठवून तसेच पोलिसांकडे तक्रार करून देखील अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही. या ठिकाणी दररोज सायंकाळी 6 नंतर कांही मंडळी विशेष करून कॉलेज विद्यार्थी जमा होऊन गटागटाने धूम्रपान करतात. यामध्ये कॉलेज युवतींचाही सहभाग असतो. कांहीजण खुल्या जागेवर आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या पार्क करून मद्यपान करतात. हा सर्व गैरप्रकार येथील रहिवाशांच्या घरासमोर खुलेआम सुरू असतो. सदर बाब याभागात राहणाऱ्या महिला आणि परिवारांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या सर्वांना उघड्यावर अतिमद्यपान करणाऱ्या लोकांमुळे रात्री घराबाहेर पडण्याची भीती वाटते. या मैदानावर फक्त मद्यपानाच नव्हे तर गांजा देखील ओढला जात असल्याचा येथील रहिवाशांचा संशय आहे.

मद्यपिंकडून छेडछाड केली जाण्याची भीती असल्याने या भागातील महिला व युवती सायंकाळी 6 नंतर घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. या ठिकाणी राव नामक व्यक्तीने भाड्याने दिलेले दुकान सुरू झाल्यापासून अलीकडे येथील धूम्रपान व मद्यपानाचे प्रकार वाढले असल्यामुळे या दुकानाची चौकशी केली जावी. कारण सदर दुकानाचा परवाना किराणा दुकान म्हणून आहे, मात्र हे दुकान चालविणार्‍या जोडप्याकडून त्या ठिकाणी मॅगी, अंडा भुर्जी वगैरे कॅंटीनचे पदार्थ बनविले जातात. त्याचप्रमाणे सिगारेट आणि मद्यपानासाठी प्लास्टिक ग्लासांची देखील विक्री केली जाते. यासंदर्भात दुकानाचे मालक राव यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रार करून देखील ते कोणतेच सहकार्य करत नाहीत.

 belgaum

तरी महापालिका आयुक्तांनी स्वतः एनसीसी ग्राउंड परिसराला भेट देऊन याठिकाणी फेकण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या आणि सर्वत्र पसरवलेली अस्वच्छता याची पाहणी करावी. तसेच संबंधित दुकानदार जोडप्यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे पोलिसांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या घरासमोर धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी.

मद्यपान करणारी मंडळी अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री12 -1 वाजेपर्यंत एनसीसी ग्राउंडवर मुक्काम ठोकत असल्यामुळे भविष्यात याचे पर्यवसान येथील घरांमध्ये चोरीच्या घटना घडण्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा महापालिका आयुक्त आणि पोलिसांनी तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाचा तपशील जाधवनगर रहिवाशांच्या निवेदनात नमूद आहे. निवेदनावर जाधवनगर येथील 50 हून अधिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या असून या निवेदनाची प्रत एपीएमसी पोलीस आणि प्रभाग क्र. 32 चे नगरसेवक संदीप जिरिग्याल यांनाही सादर करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.