साक्षी गंगूर या दहावीत शिकणाऱ्या अवघ्या 15 वर्षाच्या विद्यार्थिनीने इंग्रजी पुस्तक लिहिले असून त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज उत्साहात पार पडला.
‘फाईंड द ट्रेजर इन युवर सेल्फ… यस! यू आर प्रेशियस’ असे साक्षी गंगूर हिने लिहिलेल्या पुस्तकाचे नांव आहे. महिला विद्यालय इंग्लिश मीडियम शाळेच्या या विद्यार्थिनीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शाळेच्या सभागृहात आमदार ॲड. अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आणि आर्ष विद्या केंद्राचे श्री चित्प्रकाशानंद स्वामी यांच्या हस्ते पार पडले. या सर्वांनी साक्षीच्या लेखन प्रतिभेबद्दल प्रशंसोद्गार काढून तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी सुयश चिंतले.
दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या साक्षीने वयाच्या 15 व्या वर्षी या पुस्तकाची निर्मिती केली आहे. आपली दिनचर्या, आरोग्य, अध्यात्म, समाज, आपली मानसिक स्थिती, भावना, संयम, प्रगती, सुखकर जीवनाची मूलभूत तत्वे, धर्मशास्त्र असे अनेक विषय साक्षीने आपल्या पुस्तकात हाताळले आहेत. या पुस्तकामुळे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतात. सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो, असे साक्षीने सांगितले.
साक्षी गंगूर लिखित पुस्तकाचे प्रकाशन एम. वाय. गंगुरु फाउंडेशनच्यावतीने करण्यात आले. महिला विद्यालय शाळेच्या सभागृहात आज गुरुवारी झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते. या सर्वांमध्ये साक्षीबद्दल कौतुकोद्गार काढले जात होते.