विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावीच्या परीक्षेला आजपासून राज्यात प्रारंभ झाला बेळगाव शहरातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून कडेकोट पोलीस बंदोबस्तात सकाळी 10:30 वाजता परीक्षेला सुरुवात झाली.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे भीती पूर्ण वातावरणात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी यावेळी मात्र शिक्षण खात्याने योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे शहरातील सरदार्स हायस्कूल, भरतेश हायस्कूल, सेंट पॉल हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, सेंट मेरी हायस्कूल, महिला विद्यालय, सरस्वती हायस्कूल, चिंतामणराव हायस्कूल, ठळकवाडी हायस्कूल, गोमटेश हायस्कूल, बेननस्मिथ हायस्कूल आदी विविध ठिकाणच्या परीक्षा केंद्राबाहेर आज सकाळी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकांची गर्दी झाली होती. परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थी विद्यार्थी -विद्यार्थिनींना सामाजिक अंतराचा नियम पाळून रांगेने केंद्रात सोडले जात होते. तत्पूर्वी मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे टेंपरेचर स्कॅनिंग केले जात होते. तसेच यावेळी सॅनिटायझरचा वापर देखील केला जात होता. यामुळे बहुतांश परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी विद्यार्थिनींच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या.
गेल्या कांही दिवसांपासून हिजाब परिधान करण्यावरून मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला असल्यामुळे हिजाब किंवा इतर गोष्टींमुळे परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याची केंद्र परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची परीक्षा असणाऱ्या दहावीच्या परीक्षे वेळी गोंधळ टाळण्यासाठी शिक्षण खात्याने परीक्षेपूर्वीच गणवेशाची सक्ती केली असल्यामुळे विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या शाळेच्या गणवेशात परीक्षेसाठी आले होते.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 139 परीक्षा केंद्रावर एकूण 33,807 परीक्षार्थी दहावीची परीक्षा देत आहेत यापैकी 17,118 विद्यार्थी आणि 16,685 विद्यार्थिनी असून रिपीटर 963 आहेत. परीक्षेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंडळाने उपलब्ध केलेल्या मोफत बस प्रवासाच्या सुविधेचा आज बऱ्याच विद्यार्थ्यांना विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ झाला. विद्यार्थी हॉल तिकीट दाखवून बसने विनातिकीट आपापल्या परीक्षा केंद्रापर्यंत सुलभपणे पोहोचले.