Wednesday, November 20, 2024

/

रायबागमधील शिक्षकांची रिक्त पदे भरा : आम. एहोळे

 belgaum

रायबाग तालुक्यात शिक्षकांची 408 पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुलांनी शिकायचे तरी कसे? असा सवाल करत रायबागचे आमदार दुर्योधन एहोळे यांनी ही पदे तातडीने भरण्याची मागणी आज विधानसभेत केली.

बेंगलोर येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात आमदार दुर्योधन एहोळे यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला शिक्षकांच्या रिक्त पदावरून धारेवर धरले. निडगुंदी हायस्कूलमध्ये शिक्षक व अन्य अशा मिळून एकूण 21 पदांपैकी 13 पदे भरलेली आहेत. उर्वरित 8 पदे कधी भरणार? असा सवाल त्यांनी केला. त्यावर शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी राज्यात शिक्षकांच्या 15 हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगून निडगुंदी हायस्कूलमधील 14 नियमितपदे भरली असून दोन पदांवर अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. उरलेली 8 पदे देखील लवकरच भरण्यात येतील असे सांगितले.

मंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या आमदार एहोळे यांनी कुडची मतदारसंघात 205, रायबागमध्ये 203 अशी शिक्षकांची एकूण 408 पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी शिकणार तर कसे? असा सवाल करत शिक्षकांच्या 15 हजार पदांच्या भरतीत रायबाग तालुक्याला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली.

शिक्षक भरती व्यतिरिक्त नदी तीरांवरील गावातील शाळांची स्थिती गंभीर आहे. महापुरामुळे अनेक शाळा इमारतींना धोका पोचला आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने अनुदान मंजूर करावे, अशी मागणी आमदार दुर्योधन एहोळे यांनी केली. त्यावर उत्तर देताना शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी शिक्षकांची कमतरता आहे हे खरे आहे. येत्या मे महिन्यात पात्रता परीक्षा झाल्यावर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यावेळी संबंधित 8 रिक्त पदेही भरण्यात येतील, असे आश्वासन दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.