श्री स्पोर्ट्स क्लब खडक गल्ली आयोजित ‘श्री चषक -2022’ निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये यूपी इलेव्हन, झॅन स्पोर्ट्स, जीजी बॉईज आणि जीजी स्पोर्ट्स संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय संपादन केले.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात यूपी इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी इलेव्हन स्टार संघावर 8 गडी राखून विजय मिळवला . नाणेफेक जिंकून युपी संघाने इलेव्हन स्टार संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. इलेव्हन स्टार संघाला मर्यादित 8 षटकात 6 बाद 22 धावा काढता आल्या.
विजयासाठी 23 धावा काढण्याचे आव्हान यूपी इलेव्हन संघाने 3.1 षटकात 2 गडी गमावून 24 धावा काढण्याद्वारे पूर्ण केले. गोलंदाजीत 5 धावात 4 गडी बाद करणारा यूपी संघाचा दिपू हा ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याला प्रमुख पाहुणे सौरभ सावंत व प्रशांत बदाले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात बालाजी स्पोर्ट्स संघाला प्रतिस्पर्धी झॅन स्पोर्ट्स संघाकडून 23 धावांनी पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकणार्या बालाजी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना झॅन स्पोर्ट्स संघाने मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 86 धावा काढल्या.
प्रत्युत्तरादाखल बालाजी स्पोर्टस संघाला मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 63 धावाच काढता आल्या. फलंदाजीत नाबाद 40 धावा झळकविणारा झॅन स्पोर्ट्सचा शाहिद शेख ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी ठरला त्याला प्रमुख पाहुणे मार्केटचे पीएसआय विठ्ठल हावण्णावर आणि टिळकवाडीचे पीएसआय संतोष दळवाई यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
तिसऱ्या सामन्यात जीजी बॉईज संघाने प्रतिस्पर्धी वीरेन्द्र इलेव्हन खानापूर संघावर 10 धावांनी विजय संपादन केला. वीरेंद्र इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून जीजी बॉईजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जीजी बॉईज संघाने मर्यादित 8 षटकांत 7 गडी बाद 84 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल वीरेंद्र इलेव्हन संघाला मर्यादित 8 षटकांत 7 गडी बाद 74 धावा काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार जीजी बॉईजच्या सूर्या गावकर याला प्रमुख पाहुणे गंगाधर पाटील व विजय जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
चौथ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स ग्रामीण संघाला प्रतिस्पर्धी झॅन स्पोर्ट्स संघाकडून 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या झॅन स्पोर्ट्स संघाने मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 71 धावा काढल्या. हे आव्हान मराठा स्पोर्ट्सला पेलवले नाही आणि त्यांना मर्यादित 8 षटकात 8 गडी गमावून 57 धावा काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार झॅन संघाच्या अख्तर शेख याने पटकाविला. प्रमुख पाहुणे प्रताप जाधव व बाबन चंदगडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
आजच्या शेवटच्या पाचव्या सामन्यात जीजी स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी यूपी इलेव्हन संघावर 5 गडी राखून मात केली. जीजी स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून यूपी इलेव्हन संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. युपी संघाला 6 षटकात 7 बाद 34 धावा काढता आल्या. प्रत्युत्तरादाखल जीजी स्पोर्ट्स संघाने 5 षटकात 5 गडी बाद 36 धावा काढून सामना खिशात टाकला. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी जीजी स्पोर्ट्सचा सचिन सावंत हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे प्रवीण बिर्जे व सुभाष चौगुले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे उद्या शुक्रवार दि. 1 एप्रिल 2022 रोजी होणारे सामने पुढील प्रमाणे- सकाळी 8:30 वाजता सदा स्पोर्ट्स विरुद्ध साईराज स्पोर्ट्स, सकाळी 10:30 वा. एसजी स्पोर्ट्स विरुद्ध सरकार स्पोर्ट्स गांधीनगर, दुपारी 12 वा. अल रझा विरुद्ध युवा स्पोर्ट्स, दुपारी 1:30 वा. डिंग डॉंग स्पोर्ट्स बेळगाव विरुद्ध हिंदू स्वराज्य आणि दुपारी 3:30 वाजता दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध तिसऱ्या सामन्यातील विजेता संघ.