शनिवारी सायंकाळी बेळगाव शहराला वळीवाचा दणका बसला असून शहर आणि तालुक्याच्या परिसरात वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी दिली. त्यामुळे हवेतील उष्मा काही प्रमाणात कमी झाला.
सायंकाळी बेळगाव शहरांमध्ये अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, त्यामुळे काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.
गेल्या आठ दिवसापासून हवेतला उष्मा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे बेळगाव शहराचे तापमान वाढले होते. उष्म्यामुळे नागरिकांची तगमग होत होती.
एकंदर उन्हाचा हा तडाखा असह्य होण्यापर्यंत पोचला होता. अशा परिस्थितीत दोन दिवसापासून आकाश काहीसं काळोखी धरत होते.पावसाचा आदमास चाहूल लागली होती. अखेर शनिवारी सायंकाळी वळीवाने होळीचे निमित्त साधून जोरदार हजेरी दिल्याने परंपरागत निसर्ग नियमाचा होरा परत एकदा खरा ठरवला आहे.
होळीची धग विझविण्यासाठी पावसाचे चार थेंब पडतातच ही परंपरागत माहिती परत एकदा सिद्ध झाली आहे.बेळगावात 16 मार्च रोजी 35.8℃ तर 17 मार्च रोजी 36.6℃ इतकी गरमी वाढली होती त्यामुळे शनिवारी सायंकाळी झालेल्या वळीवा दरम्यान बेळगाव काहीसे का असेना कुल झाले होते.