बेळगाव शहर आणि परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी या सेवाभावी शाखेला रोटरी क्लब वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे एक रुग्णवाहिका देणगीदाखल देण्यात आली आहे.
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली हेल्प फाॅर नीडी शाखेला एक रुग्णवाहिका देणगीदाखल देण्याचा कार्यक्रम आज सोमवारी दुपारी पार पडला. रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. गौरीश धोंड आणि रो. प्रतिमा धोंड यांनी रुग्णवाहिकेच्या किल्ल्या सुरेंद्र अनगोळकर यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी गौरिष धोंड यांनी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशन आपल्या शाखांच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
सदर रुग्णवाहिका रो. अशोक पाटील यांनी खरेदी करून हेल्प फाॅर नीडीला द्यावी यासाठी रोटरी क्लब वेणूग्राम बेळगावकडे सुपूर्द केली होती. समाज सेवेसाठी मोठ्या विश्वासाने आपल्याकडे ती रुग्णवाहिका सुपूर्द केल्याबद्दल सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे सुरेंद्र अनगोळकर यांनी रो. अशोक पाटील यांचे आभार मानले. याप्रसंगी रोटरी वेणूग्रामचे अध्यक्ष रो. अरविंद खडबडी, सेक्रेटरी रो. विनयकुमार बाळीकाई, रो. प्रसाद कट्टी, रो. संजीव देशपांडे, रो. महेश अनगोळकर, रो. व्यंकटेश देशपांडे, रो. संग्राम पाटील, रो. दिनेश काळे, नितेश सुतार आदी उपस्थित होते.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनच्या फुड फाॅर नीडी या शाखेच्या माध्यमातून गेल्या 2017 सालापासून सिव्हिल हॉस्पिटलच्या मेटर्निटी वॉर्डच्या ठिकाणी दररोज सायंकाळी 150 ते 200 रुग्ण आणि त्यांच्या सहाय्यकांना मोफत अन्न वाटप केले जाते.
हेल्प फाॅर नीडी शाखेच्या माध्यमातून बेळगाव शहर परिसर, हुबळी, खानापूर आणि गोवा या भागातील गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे एज्युकेशन फाॅर नीडी या शाखेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी आत्तापर्यंत 19 लाख 75 हजार रुपयांचा निधी समाजातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करण्यात आला आहे हे विशेष होय.