शहरातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ एपीएमसी भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.
जय किसान होलसेल भाजी मार्केट हे पूर्णपणे अनाधिकृत भाजी मार्केट असून या मार्केटमुळे सरकारचे एपीएमसी मार्केटचे नुकसान होत आहे. लक्षावधी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आलेल्या एपीएमसी मार्केट मधील व्यापार ठप्प झाला आहे.
तेंव्हा एक तर जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट तात्काळ बंद करावे अथवा आम्हाला दया मरण पत्करण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी करत एपीएमसी भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
यावेळी आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांनी अंगातील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत जोरदार निदर्शने केली. जय किसान भाजीमार्केटच्या विरोधात एपीएमसी मार्केट यार्डमध्ये बेमुदत धरणे सत्याग्रह करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या पद्धतीने अचानक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन छेडलेले आंदोलन सार्यांचे लक्ष वेधून घेत होते.