पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या येत्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या ‘परीक्षा पे चर्चा” या विषयावरील पाचव्या सत्रातील परस्पर संवाद कार्यक्रमासाठी बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
मच्छे येथील केंद्रीय विद्यालय क्र. 3 या शाळेचा विद्यार्थी श्रेयश मरगणकोप्प आणि सांबरा येथील केंद्रीय विद्यालय क्र. 1 या शाळेची विद्यार्थिनी जानव्ही डिबेल अशी 1 एप्रिल रोजीच्या कार्यक्रमात पंतप्रधानांशी संवाद साधणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील. त्याचप्रमाणे परीक्षा लिहिताना तणावमुक्त कसे रहावे, याबाबतही मार्गदर्शन करणार आहेत. सदर परस्पर संवादाचा कार्यक्रम आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने होणार आहे.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आज बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ‘परीक्षा पे चर्चा’ हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असल्यामुळे सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे आपापल्या
कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये थेट प्रसारण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. जेणेकरून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.